
मलकापूरमध्ये १.९७ कोटींची रोकड जप्त; दोन संशयित ताब्यात
MH 28 News Live / मलकापूर : शहरातील बोदवड नाका येथील वानखडे पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी २३ मे रोजी दुपारी कारवाई करत एका कारमधून तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी दोन इसमांसह गाडी ताब्यात घेतली असून, पुढील चौकशीसाठी रोकड जिल्हा कोषागार, बुलढाणा येथे जमा करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. दुपारी १.३० वाजता, पोलिस पथक बोदवड रस्त्यावर तैनात झाले होते. एमएच २० जीव्ही १७८१ क्रमांकाची सिल्व्हर रंगाची इरटीगा गाडी थांबवून तपासली असता, तिच्यातील दोघे इसम (रा. छत्रपती संभाजीनगर) उडवाउडवीची उत्तरे देत होते. गाडीची तपासणी केली असता, सीटखाली मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम लपवलेली आढळून आली.
गाडीच्या आजूबाजूला जमणारी गर्दी लक्षात घेता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल विभागाचे दोन पंच आणि स्टेट बँकेचे अधिकारी यांच्या समोर रोख रक्कम मोजण्यात आली. व्हिडिओ शुटिंग करत रक्कम मोजली असता १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत पंचनामा करून संपूर्ण रक्कम आयकर विभाग, नागपूर यांना माहिती देत आर्म गार्डसह जिल्हा कोषागार, बुलढाणा येथे जमा करण्यात आली.
ही महत्त्वपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी व त्यांच्या पथकाने केली.