
जळगावचा वाल्मिक कराड कोण ? पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण… सीआयडी चौकशीची मागणी
MH 28 News Live / जळगाव जामोद ( अमोल भगत ) : येथील भाजपा कार्यकर्ता आणि आमदार संजय कुटे यांचे एकेकाळी वाहन चालक व त्याच्या निकटवर्ती असणारे पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे. पंकज देशमुख यांनी जीवन संपवलं नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा आरोप त्यांची पत्नी सुनिता देशमुख यांनी केला आहे. त्यांनी सीआयडी चौकशीची जोरदार मागणी केली असून स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
‘मस्साजोग’सारखी घटना पोलिसांपुढे गंभीर आव्हान :
३ मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. त्यांच्या शरीरावर हात, पाय आणि मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. यामुळे आत्महत्येचा दावा संशयास्पद ठरत आहे.
या घटनेची तुलना अलीकडील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी केली जात आहे. पंकज देशमुख गेल्या २२ वर्षांपासून भाजपा कार्यकर्ते असून आमदार संजय कुटे यांच्यासोबत कार्यरत होते. त्यामुळे यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा छडा लावणे हे बुलढाणा पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे.
सखोल चौकशीची गरज
सुनिता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती) यांच्याकडे तक्रार दाखल केली असून स्थानिक पोलिसांकडून चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
“जळगाव जामोद पोलिसांवर विश्वास नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता वरिष्ठ यंत्रणांनी हस्तक्षेप करून सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.