
चोरट्यांच्या ‘ हिटलिस्ट ‘ वर आता म्हशी… चिखली तालुक्यात पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराट…!!
MH 28 News Live / चिखली : चोरटे काय चोरतील याचा आता काही नेम राहिलेला नाही ! पैसे, दागदागिने, धान्य, सुकामेवा हे तर सोडाच, आता चोरांच्या हिटलिस्टवर थेट पाळीव जनावरे आले आहेत. चिखली तालुक्यात आणि परिसरात म्हैस चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. या टोळीने शेतकऱ्यांची झोपच उडवून दिली आहे.
तालुक्यातील खैरव येथे दोन दिवसांपूर्वी गोठ्यातून दोन म्हशी चोरी गेल्याची घटना घडली. संजय देवकर आणि त्यांच्या भावाच्या मालकीच्या या म्हशी सोमवारी रात्री गोठ्यात लावलेल्या कुलुपाची तोडफोड करून चोरट्यांनी पळविल्या. विशेष म्हणजे, याआधीही मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे असाच प्रकार घडल्याची नोंद आहे.
देवकर यांनी ही तक्रार चिखली पोलीस ठाण्यात देण्याचा प्रयत्न केला; मात्र तीन दिवस उलटून गेले तरीही पोलीस तक्रार नोंदवण्यास तयार नाहीत, ही बाब अधिकच संतापजनक ठरते. देवकर यांना “आधी चौकशी करतो, मग तक्रार घेऊ” असे सांगून बीट जमादार कडूबा मुंडे यांनी थातूरमातूर उत्तर देत वेळ मारून नेली.
यासंदर्भात संपर्क साधल्यावर बीट जमादार मुंडे म्हणाले की, “सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, पोलीस पथक तपास करत आहे,” पण आजपर्यंत साधा FIR देखील दाखल न झाल्याने पोलिसांच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित होतो. चिखली आणि आजूबाजूच्या भागात पाळीव प्राण्यांची चोरी करणारी टोळी बिनधास्तपणे फिरत आहे आणि पोलीस विभाग मात्र झोपेत आहे का, असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
पोलिसांसाठी ‘वेळ आली आहे जागे होण्याची
या घटनांमुळे शेतकरी बांधव प्रचंड चिंतेत असून, आता आपल्या जनावरांची देखभाल करण्याबरोबरच त्यांची चोरी होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. पाळीव प्राण्यांवर देखरेख ठेवण्याबरोबरच गावोगावी दक्षता समित्या निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कसरतीतून सुटका नाहीच, पण आता त्यांच्या जनावरांवरही डोळा ठेवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी वेळीच जागे होऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा ‘गाई-गुरे ही शिल्लक राहणार नाहीत’ अशी परिस्थिती ओढवेल.