♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजकीय शत्रुत्वाचा होणार शेवट ? सानंदा-फुंडकर संघर्षावर पडणार पडदा ? माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने जिल्ह्यात उसळली चर्चेची लाट

MH 28 News Live / खामगाव : राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा खामगावमध्ये येत आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेसचे नेते दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सानंदा यांचा पक्षप्रवेश येत्या १२ जून रोजी खामगाव येथे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असून, यासाठी भव्य शक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सानंदा यांनी एक महत्त्वाचा राजकीय संकेत दिला आहे. त्यांनी खामगावचे विद्यमान आमदार व राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी असलेले चार दशकांहून अधिक काळाचे परंपरागत राजकीय वैर संपवण्याची तयारी सानंदा यांनी दर्शवली आहे.

काय म्हणाले सानंदा ?

“१२ जून रोजी अजितदादा खामगाव येथे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत आपण राज्याचे माजी मंत्री, स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करणार आहोत. समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही अजितदादांसह मंत्री आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी ‘चहा-पाण्या’साठी जाण्याचाही मानस बाळगतो,” असे विधान दिलीपकुमार सानंदा यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण महायुतीचे घटक होणार असून त्यामुळे भाजपचे नेते व मंत्री असलेल्या आकाश फुंडकर यांच्याशी आपले नाते हे मित्र पक्षाचे असेल असे सुद्धा दिलीप कुमार सानंदा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एक नवीनच चर्चेची लाट उसळली आहे.

खरोखरच सानंदा यांनी जसे सांगितले तसे घडले, तर खामगाव विधानसभा मतदारसंघातील दोन टोकांचे विरोधक सानंदा आणि फुंडकर यांच्यातील ४० वर्षांचा संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होईल. तथापि, “हे खरंच होणार का ?” हा प्रश्न दोघांच्याही समर्थकांमध्ये उपस्थित होतो आहे. शेवटी काय घडेल हे काळच ठरवेल, पण सध्या तरी दिलीपकुमार सानंदा यांच्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एक नव्या शक्यतांचा वादळ उठले आहे, एवढे मात्र नक्की !

अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा!

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129