
खाजगी शाळांची मनमानी थांबवा – मनोज जाधव… अतिरिक्त शुल्कवसुलीविरोधात तात्काळ कारवाईची मागणी
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील काही नामांकित व नव्याने सुरू झालेल्या खाजगी शाळा व महाविद्यालयांकडून शासनाच्या निर्देशांना बगल देत विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर व अनावश्यक अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. याविरोधात विदर्भ दूतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव यांनी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती चिखली यांना निवेदन सादर करत तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
युनिफॉर्म, शूज, बॅग, पुस्तके ठराविक दुकानदारांकडून खरेदी करण्याची सक्ती केली जाते.
स्मार्ट क्लास, संगणक, अॅक्टिव्हिटी फीच्या नावाखाली अवाजवी शुल्क आकारले जाते.
ट्रान्सपोर्ट सेवेसाठी अनियंत्रित दर आकारले जातात.
अतिरिक्त परीक्षा शुल्क व इव्हेंट फी पालकांच्या संमतीशिवाय घेतली जाते.
फीची अधिकृत पावती दिली जात नाही, तसेच माहिती पारदर्शक नसते.
मनोज जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्याचे अशा प्रकारे व्यावसायिकीकरण करून पालकांना आर्थिक अडचणीत टाकणे चुकीचे आहे.”
त्यांनी पुढील उपाययोजनांची मागणी केली आहे:
अशा शाळांची चौकशी करून किती शुल्क घेतले जाते, याची माहिती गोळा करावी.
दोषी आढळलेल्या शाळांवर कठोर कारवाई केली जावी.
प्रत्येक शाळेला शासननिर्दिष्ट फी संरचना फलकावर लावणे बंधनकारक करावे.
पालकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन किंवा तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे.
फीविषयक सर्व माहिती ऑनलाईन पोर्टलवर पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी.
“शासनाने शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना काही शाळा हेच उद्दिष्ट उध्वस्त करत आहेत,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा मनोज जाधव यांनी व्यक्त केली आहे.