
सिंचन विहिर योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मनसेचा चिखलीत घंटानाद
MH 28 News Live / चिखली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये पंचायत समिती चिखली अंतर्गत एकूण ६०६ विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर सिंचन विहीर योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून एका विहिरीसाठी प्रत्येकी ७० हजार रुपयांची रक्कम काही रोजगार सेवक, ग्राम पंचायत सचिव त्याचप्रमाणे खाजगी दलालांमार्फत अधिकाऱ्यांनी घेतल्याची सर्वत्र चर्चेला आहे.
ग्राम पंचायत कार्यालया मार्फत घेतलेल्या ग्राम सभेमध्ये विहीर मंजुरी करिता जो प्राधान्यक्रम दिलेला आहे त्या नुसार विहिरीचे वाटप झालेले नसून कोणताही प्राधान्यक्रम अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विधवा महिला विकलांग कुटुंबातील कर्ता व्यक्ती महिला दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या गोरगरीब नागरिकांना वगळता केवळ पैसे पुढे करणाऱ्या दांडग्यांच्या विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सिंचन विहीर घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. १९ मे रोजी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन देऊन सदर योजनेत स्वतः लक्ष देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी समितीद्वारे चौकशी करण्यात येऊन बोगस लाभार्थ्यांना वाटप झालेल्या विहिरीत तात्काळ रद्द करून गरजू लाभार्थ्यांना सिंचन विहिरी योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली होती.
परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याने मनसेकडून दि. ९ जुन रोजी पंचायत समिती चिखली येथे झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी सकाळी ११ वाजेपासून मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, चिखली तालुकाध्यक्ष विनोद खरापास, चिखली शहर अध्यक्ष नारायण देशमुख, तालुका सचिव प्रवीण देशमुख, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण येवले, उप तालुका अध्यक्ष संदीप नरवाडे, उप तालुकाध्यक्ष अविनाश सुरडकर, चिखली शहर उपाध्यक्ष रवी वानखेडे, तालुका सचिव अजय खरपास, मनसे विद्यार्थी सेनेचे उप तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, विद्यार्थी सेना चिखली शहर अध्यक्ष अंकित कापसे, दिनकर खरपास, पंढरी मैंद, मंगेश उगले, स्वप्नील थिगळे, सागर इंगळे मधुकर ठेंग,विठ्ठल इंगळे, अंकुश भरंडवाल, विजय शिरसाट, शुभम जाधव, शेषराव जाधव, सिद्धू अक्कर, दीपक बरबडे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.