♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हसतमुख गौरवचा अखेरचा निरोप… विजेचा शॉक लागून चिमुकल्या मुलाचा मृत्यू

MH 28 News Live / नांदुरा : घरातून निघताना बापाने प्रेमळ नजरेने पाहिलेल्या आणि गालावरून हात फिरवून निरोप दिलेल्या चार वर्षांच्या लाडक्या चिमुकल्याची भेट तीच शेवटची ठरेल, याचा विचारही त्याला कधी स्पर्शून गेला नव्हता. काळाच्या क्रूर फेऱ्याने एक बापाचा आधार हिरावून नेला… एक आईचे ममतेचे आकाश अचानक कोसळले.

वडाळी येथील लहानगा गौरव चेतन वक्टे याचा घरात खेळत असताना विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, १८ जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. त्या दिवशी त्याचे वडील चेतन वक्टे शेतामध्ये काम करत होते आणि आई घरकामात गुंतलेली होती. नेहमीप्रमाणे घरातच खेळणारा गौरव, निष्पापपणे कुलरजवळ गेला आणि क्षणात विजेच्या धक्क्याने जमिनीवर कोसळला. आईने धावत त्याला उचलले आणि तातडीने नांदुरा येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. परंतु डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केले. हसत-खेलत वावरणाऱ्या या नन्ह्या जीवाचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

गौरव हा गावात सर्वांचा लाडका होता. त्याचं निरागस हास्य, चिवचिवाट, आणि कुणालाही जवळ करणारं स्वभाव काही क्षणांत काळाच्या गर्तेत हरवून गेलं. वडाळी गावावरच नव्हे, तर संपुर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. लहानशा गौरवच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेनंतर एक कटू वास्तव पुन्हा अधोरेखित झालं. विजेच्या उपकरणांबाबत सतर्कतेचा अभाव आणि क्षणिक निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो. कुलरमध्ये पाणी भरताना किंवा त्याचा वापर करताना वीज पुरवठा बंद करणे अत्यावश्यक आहे. हे सांगितले जात असले, तरीही त्याकडे दुर्लक्ष होणे जीवावर बेतू शकते, हे या दुर्घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

पालकांनी लहान मुलांकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज या निमित्ताने प्रकर्षाने पुढे आली आहे. ‘क्षणभर नजर चुकली, आयुष्यभराची पोकळी मिळाली’ — याचा हृदयद्रावक अनुभव वक्टे कुटुंबाला आला आहे. गौरवचे अंतिम संस्कार वडाळी येथे करण्यात आले. त्याच्या जाण्याने गावात शांततेचं सावट पसरलं असून प्रत्येक चेहऱ्यावर हळहळ दिसून येत आहे. एक छोटासा दिवा अनपेक्षितपणे विझला… आणि मागे राहिलं केवळ अंतःकरण कापणारं शून्य.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129