♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन व सहकार्य करावे – देवदत्त जोशी विदर्भ प्रदेश अभ्यास वर्गानिमित्त आयोजित पूर्व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

MH 28 News Live / चिखली : गेल्या ७६ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन लढणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ध्येय हे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राष्ट्रीय पुनर्जागरण करणे हे असून या ध्येयाच्या प्राप्तीसाठी जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन व सहकार्य करावे असे आवाहन अभावीपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांनी केले. स्थानिक आदर्श विद्यालयात सुरू असलेल्या विदर्भ प्रदेश अभ्यासवर्गानिमित्त दि. १९ जून रोजी आयोजित पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरणास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके, पूर्व कार्यकर्ता संमेलनाचे संयोजक सुधीर कुळकर्णी, चिखली नगर अध्यक्ष डॉ. पंकज शेटे, बुलढाणा चिखली भाग प्रमुख कु.अमृता गुप्ता यांची उपस्थिती होती.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात देवदत्त जोशी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेपासून आजवरच्या प्रवासाचा धावता आढावा घेतला. बदलत्या काळात व बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत विद्यार्थी संघटना म्हणून अभावीपच्या कार्यशैलीमध्ये देखील काही काळानुरूप बदल झाले असून केवळ विद्यार्थ्यांच्या समस्या मांडणे एवढ्या पुरतेच आमचे कार्य मर्यादित राहिले नसून त्या समस्यांवर उपाययोजना करणे हा देखील आपल्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेपासून विदर्भातील गावोगावी संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते तत्कालीन विद्यार्थी दशेतील कार्यकर्ते कार्यात सहभागी झाले. आज यापैकी बहुतांश कार्यकर्ते हे ज्येष्ठ नागरिक म्हणून समाजात वावरत आहेत. त्यांनी आजही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आपली नाळ जोडून ठेवली हे कौतुकास्पद असून भविष्यात विद्यार्थी परिषदेच्या वाटचालीसाठी नव्या कार्यकर्त्यांना या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन व सहकार्य करावे असे आवाहन देवदत्त जोशी यांनी एकत्रीकरणात सहभागी झालेल्या जुन्या कार्यकर्त्यांना केले.

या मेळाव्यात पूर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सुनील वायाळ ( चिखली ), बाबासाहेब वरणगावकर ( बुलढाणा ), संकेत सावजी ( मेहकर ), सुनील धोंडकर ( देऊळगाव राजा ) व स्वप्नील आळेकर ( खामगाव ) यांनी आपले विचार व्यक्त केले. एकत्रीकरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश कुळकर्णी यांनी तर प्रास्ताविक सुधीर कुळकर्णी यांनी केले. डॉ. पंकज शेटे यांनी आभार मानले. सद्यस्थितीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, शेती, व्यापार आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्ह्यातील जुने कार्यकर्ते या एकत्रीकरणास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129