
राहुल बोंद्रे भाजपच्या उंबरठ्यावर; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला ? चिखलीत समर्थकांच्या जमवाजमवीला वेग ! २५ वर्षांची काँग्रेसची साथ सुटणार ?
MH 28 News Live / चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या भारतीय जनता पक्षातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी प्रवेशाचा मुहूर्तही जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
२०२४ पासून होत आहे चर्चा
गेल्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय असलेल्या राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा २०२४ पासून सुरू आहे. तेव्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात होते. मात्र अखेरच्या क्षणी बोंद्रे काँग्रेसमध्येच राहिले. मध्यंतरी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चाही रंगल्या. आता गेल्या १० दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे.
संस्थांवरील चौकशांचा दबाव ?
राजकारणाबरोबरच शिक्षण व सहकार क्षेत्रातही बोंद्रे यांचा प्रभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, अनुराधा अर्बन बँक आणि मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी यांसारख्या संस्था आहेत. त्यांच्या सुविधे पत्नी वृषाली बोंद्रे या देखील हिरकणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा आहेत. या संस्थांबाबत अनियमिततेच्या तक्रारी, चौकशा, न्यायालयीन दावे आणि पोलिसांत गुन्हे दाखल झाले. आपल्या संस्थांबाबतच्या चौकशा आणि न्यायालयीन प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी भाजपा प्रवेशाची खेळी खेळण्याची जोरदार चर्चा होत आहे. मात्र या चर्चेला बोंद्रे यांच्याकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
फडणवीसांसह दिल्लीतील नेत्यांच्या भेटी
भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर बोंद्रे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट तसेच दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती आहे. मुकुल वासनिक यांचीही दिल्ली येथे भेट घेऊन राहुल बोंद्रे यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली आणि वासनिकांनी सुद्धा सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ” दिल्या घरी तू सुखी रहा… ” असा आशीर्वाद दिल्याची देखील चर्चा आहे.
श्वेताताई महाले यांच्या विरोधाची चर्चा
बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला त्यांच्या प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी तथा विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांनी विरोध दर्शवला. स्थानिक पातळीवर देखील भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीमध्ये विरोध करण्यात आला. मात्र पक्षश्रेष्ठींची भूमिका बोंद्रे यांच्या बाजूने असल्यास स्थानिक विरोध कितपत प्रभावी ठरेल, हा प्रश्न आहे.
समर्थकांची भूमिका निर्णायक
दिल्लीहून परतल्यानंतर बोंद्रे यांनी काँग्रेसमधील सहकारी, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच बाजार समिती संचालकांच्या बैठका घेतल्याचे सांगितले जाते. काहींनी असहमती दर्शवली असली, तरी अनेकांनी त्यांना पाठिंबा देत भाजपमध्ये सोबत येण्याची तयारी दर्शविल्याची चर्चा आहे. चिखली नगरपालिकेतील काँग्रेसच्या १२ पैकी नऊ नगरसेवकांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचेही सांगितले जात आहे.
१३ ऑगस्टचा मुहूर्त ?
सूत्रांच्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोंद्रे समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम शक्य न झाल्यास १८ किंवा २३ ऑगस्ट या पर्यायी तारखांचाही विचार सुरू असल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम
राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश झाल्यास त्याचा परिणाम केवळ चिखली मतदारसंघापुरता मर्यादित न राहता बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.



