
कांद्याला पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून बिबट्या झाला पसार
MH 28 News Live, चिखली : शेतातील कांदा पिकास पाणी देण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी करण्याची घटना दि. १४ मार्चला सकाळी ८ वाजेदरम्यान तालुक्यातील किन्ही सवडद येथे घडली.
येथील शेतकरी गणेश समाधान क्षीरगसार (वय ३६ ) हे त्यांच्या शेतातील कांदा पिकास पाणी देण्याकरिता गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करीत हात, पोट, मांड्यावर वार करून जखमी केले. त्यांनी वेळीच आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी धावून आल्यामुळे सदर बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गणेश क्षीरसागर यांना उंद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ल्यात कमालीची वाढ झाल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.



