♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बायोडिझेल पंपातील दुर्दैवी शोकांतिका; मलकापुरात दोन तरुणांचा मृत्यू, एकाचा जीवाशी संघर्ष

MH 28 News Live / मलकापूर : शहराला हादरवून टाकणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायगाव फाट्यानजीक असलेल्या बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून आणखी एक तरुण अत्यवस्थ अवस्थेत जीवासाठी झुंज देत आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या भीषण दुर्घटनेत साजीदखान जलीलखान (वय २२) व मुस्ताकखान जब्बारखान (वय ३८) या दोघांचा मृत्यू झाला. तर आरिफखान बशिरखान (वय ३८) हा गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर आयुष्यमान रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत व जखमी तिघेही मलकापूरमधील पारपेठ प्रभागातील रहिवासी असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

२५ सप्टेंबरच्या रात्री हे तिघे घरून बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. रात्री उशिरा कुटुंबीयांना पंपावरून अपघाताची माहिती मिळाली. मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तर जखमी तरुणावर शर्थीचे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या बायोडिझेल पंपाबद्दल स्थानिकांकडून अनेक शंका व्यक्त होत आहेत. हा पंप काही काळापासून बंद असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. मग या तरुणांनी टाकीत का प्रवेश केला? ते स्वच्छतेसाठी गेले होते का, की काही वेगळे कारण होते? याबाबत संभ्रम असून चौकशीची मागणी होत आहे.

अचानक दोन तरुणांचा मृत्यू आणि आणखी एकाचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष यामुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तृत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणांचे असे दुर्दैवी निधन होत असल्याने नातेवाईक व मित्रपरिवारात हतबलता दाटून आली आहे. या घटनेने केवळ एक कुटुंबच नाही तर संपूर्ण समाज व्यथित झाला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129