♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगाव हादरलं ! रक्तपेढी संचालक डॉ. गोपाल सोनी यांचा शेतात संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय ?

MH 28 News Live / खामगाव, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना खामगाव येथे उघडकीस आली आहे. शहरातील एकमेव रक्तपेढीचे संचालक व प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. गोपाल सोनी यांचा मृतदेह त्यांच्या शेतात संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूमागे घातपात आहे का, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री डॉ. सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. मात्र, शेतात गेल्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांतच त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. रात्रीच्या वेळी ते शेतात का गेले होते, त्यांच्यासोबत नेमके काय घडले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या गूढ मृत्यूमुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. गोपाल सोनी हे अनेक वर्षांपासून ‘सोनी रक्तपेढी’च्या माध्यमातून हजारो रुग्णांना रक्तपुरवठ्याची सेवा देत होते. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचा बुलढाणा जिल्हाभर मोठा जनसंपर्क होता. अशा लोकप्रिय आणि नामांकित डॉक्टरांचा अचानक झालेला संशयास्पद मृत्यू वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, डॉ. सोनी यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला की त्यामागे घातपात अथवा अन्य कोणते कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, शवविच्छेदन अहवाल आणि वैज्ञानिक तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेने संपूर्ण खामगाव शहर हादरले असून, मृत्यूमागील गूढ काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासातून सत्य समोर येणार का, याची उत्सुकता वाढली असून या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129