
लोणार पोलीस बनले देवदूत; चिमुकल्याचे वाचवले प्राण
MH 28 News Live / लोणार : शहराबाहेरील घरकुल परिसरात ही धडकी भरवणारी घटना घडली. लोणार पोलीस स्टेशनचे बीट जमादार संतोष चव्हाण आणि पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे नियमित पेट्रोलिंग करत असताना, एका डोहाजवळ एक चिमुकला पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एक क्षणही न गमावता पोलीस अंमलदार निकस यांनी पाण्यात उडी घेतली आणि जीवाची पर्वा न करता त्या बालकाला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले.
ही एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी अशी थरारक आणि भावनिक घटना प्रत्यक्षात घडली असून, संपूर्ण परिसरात पोलिसांच्या या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक होत आहे. वाचलेला मुलगा सुखरूप कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

धोकादायक डोह, निष्क्रिय प्रशासन
ही घटना जिथे घडली, त्या घरकुल परिसरातील डोहाबाबत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या ठिकाणी सतत पाणी साचून राहते, त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा स्थानिक नागरिक देत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असले तरी फक्त सूचना पुरेशी नाहीत. या ठिकाणी संरक्षक भिंत, चेतावणी फलक किंवा अडथळे बसवण्यासारखी तातडीची पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा, पुढील वेळी इतके नशिब बलवत्तर नसेल, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. ही घटना पोलिसांची तत्परता आणि धाडस दाखवणारी असली तरी ती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि अपुऱ्या उपाययोजनांचे प्रत्यंतरही आहे. वेळेवर उपाय न झाल्यास भविष्यात अशीच आणखी एक दुर्दैवी घटना टाळता येणार नाही.



