
जळगाव जामोदमध्ये धाड : ५८४ क्विंटल रेशन तांदूळ व ट्रक जप्त, तिघांना अटक
MH 28 News Live / जळगाव जामोद ( अमोल भगत ) : गरीब व गरजूंसाठी असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदळाचा प्रचंड साठा काळाबाजारात विक्रीसाठी जात असल्याचा पर्दाफाश बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने केला आहे. या कारवाईत तब्बल ५८४ क्विंटल रेशन तांदूळ आणि ट्रक जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या धाडीत अंदाजे ४२.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड बु. गावात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेशन तांदूळ गोदामात साठवून तो गुजरातमध्ये विक्रीसाठी ट्रकद्वारे नेला जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार रविवार, २८ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद–नांदुरा मार्गावर सापळा लावण्यात आला.
त्यावेळी संशयित ट्रक (क्र. जीजे ०३ सीयू २२८२) अडवून तपासणी केली असता त्यात २४० क्विंटल रेशन तांदूळ (किंमत ६ लाख ७९ हजार ८०० रुपये) आढळून आला. चौकशीत ट्रकचालक भट्टी कादर कासम (५५, रा. अरबशेरी मालीया, जि. राजकोट, गुजरात) याने हा तांदूळ कुरणगाड बु. येथील आटोळे यांच्या गोदामातून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गोदामाची तपासणी केली असता आणखी ३४४ क्विंटल रेशन तांदूळ (किंमत १० लाख ३२ हजार रुपये) साठवलेला आढळला.

एकूण ५८४ क्विंटल रेशन तांदूळ, किंमत अंदाजे १७.५२ लाख, तसेच २५ लाखांचा ट्रक असा मिळून ४२.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी वैभव सुनिल आटोळे (२५), अंकुश केशव आटोळे (२२) आणि ट्रकचालक भट्टी कादर कासम यांना जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही काळाबाजाराचा विळखा
या प्रकरणातून स्पष्ट होते की गरीबांसाठी असलेले धान्य काळाबाजाराच्या जाळ्यात अडकले आहे. केवळ जळगाव जामोदच नव्हे तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही स्वस्त धान्य दुकानातून मिळालेला तांदूळ खुलेआम काळ्या बाजारात विकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने अशा गैरव्यवहारांवर कठोर नजर ठेवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची तातडीची आवश्यकता आहे. अन्यथा रेशन हक्कापासून वंचित राहणाऱ्या गरीब कुटुंबांचे हाल अधिकच वाढणार आहेत.



