
पेट्रोल _ डिझेल टंचाईच्या झळा; धरु लागले एकमेकांचा गळा… पंपावर पोलिसांसमोरच २५ जणांकडून युवकाला बेदम मारहाण
MH 28 News Live / सिंदखेडराजा : तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या रांगेतून मध्यरात्री भीषण गोंधळ उडाला. इंधनटंचाईमुळे वाहनधारकांची मोठी गर्दी झालेली असतानाच रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर गेला. संतप्त झालेल्या तब्बल २५ जणांच्या जमावाने एका युवकाला पोलिसांसमोरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पेट्रोल पंप परिसर रणांगणात परिवर्तित झाला होता.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पेट्रोल पंपावर दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र अचानक आक्रमक झालेल्या मोठ्या जमावासमोर पोलिसांचीही असहाय्यता दिसून आली. “इतक्या मोठ्या जमावासमोर आम्ही फक्त दोनच कर्मचारी होतो, आम्ही तरी काय करणार?” अशी प्रतिक्रिया संबंधित पोलिसांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, इंधनटंचाईमुळे राज्यातील अनेक भागांत तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. वाशिम येथील एका पेट्रोल पंपावरही वाहनधारक आणि शेतकरी यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे वाढती गर्दी, अपुरा बंदोबस्त आणि इंधनासाठीची झुंबड यामुळे परिस्थिती चिघळत असल्याचे स्पष्ट होत आहे.



