
मोदी सरकारचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार; प्रतापराव जाधव राहणार की जाणार ? जिल्ह्यात चर्चेचा विषय
MH 28 News Live / बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फेरबदल आणि विस्तार गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रातही या विस्ताराबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहणार की त्यांच्यावर गंडांतर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांना आपल्या गटात आणत केंद्रातील एनडीएमधील राजकीय वजन वाढवले आहे. त्यामुळे शिंदे गटाला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विद्यमान मंत्री प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद कायम ठेवून अतिरिक्त चेहऱ्यांना संधी दिली जाणार की त्यांना वगळून नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
कामगिरीच्या जोरावर मंत्रिपद कायम राहणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत त्यांनी शेगाव येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन, आरोग्य सर्वेक्षण कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी तसेच बहुप्रतीक्षित खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. या कामगिरीच्या आधारे त्यांचे मंत्रिपद कायम राहण्याची शक्यता काही राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत आशावादी वातावरणही दिसून येत आहे.
नव्या चेहऱ्यांच्या चर्चेमुळे वाढली उत्सुकता
दुसरीकडे, काही राजकीय विश्लेषकांच्या मते केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून प्रतापराव जाधव यांची कामगिरी अपेक्षेइतकी प्रभावी ठरलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन करूनच फेरबदलाचा निर्णय घेतात, अशी त्यांची कार्यपद्धती मानली जाते. त्यामुळे जाधव यांचे मंत्रिमंडळातील स्थान पूर्णपणे सुरक्षित असल्याचे ठामपणे सांगता येत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. याशिवाय शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ खासदार श्रीरंग बारणे तसेच अलीकडेच पक्षात दाखल झालेले खासदार संजय जाधव आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावांचीही केंद्रीय मंत्रिमंडळासाठी जोरदार चर्चा आहे. या संभाव्य दावेदारांपैकी एक-दोन जणांना संधी मिळाल्यास प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद गमवावे लागू शकते, अशीही शक्यता काही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
एकूणच, मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात प्रतापराव जाधव यांचे केंद्रीय राज्यमंत्रीपद कायम राहणार, त्यांच्या खात्यात बदल होणार की त्यांना मंत्रिमंडळाबाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा होताच या चर्चांवर पडदा पडणार असून, बुलढाण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आता दिल्लीतील घडामोडींवर खिळले आहे.



