♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खाकीचा अजब कारभार ! मृत घोषित केलेली मुलगी निघाली जिवंत; निष्पाप बाप-भावाला जेलमध्ये धाडणाऱ्या पोलिसांची मोठी नाचक्की

MH 28 News Live / ​जळगाव जामोद : सुमारे २० दिवसांपूर्वी जळगाव जामोद पोलिसांनी ज्या विवाहित मुलीची हत्या झाल्याचा दावा केला होता, आणि ज्या प्रकरणात तिच्या निष्पाप वडील व भावाला अटक करून तुरुंगात डांबले होते, ती मुलगी चक्क जिवंत निघाली आहे. मृत घोषित केलेली मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याने बुलढाणा पोलिसांचा ढिसाळ कारभार आणि निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

​काय आहे संपूर्ण प्रकरण ?

​जवळपास २० दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. अत्यंत क्रूरपणे केलेल्या या हत्येमध्ये मृतदेहाचे शिर कापून काही फुटांवर फेकण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला होता.

​पोलिसांचा अजब आणि घाईगडबडीचा दावा

​या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी घाईघाईने दावा केला की, ती मृत महिला मध्य प्रदेशातील शिवानी बापूराव कळमेकर आहे. शिवानीचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते आणि याच रागातून तिच्या वडिलांनी व भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रात आणून टाकला.

​डीएनए चाचणी न करताच कारवाई

​सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, राजुरा धरणावर आढळलेल्या त्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची कोणतीही शास्त्रीय डीएनए (DNA) तपासणी न करताच पोलिसांनी थेट कारवाई केली. शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ​”शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार आम्ही आधीच स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, बुलढाणा पोलिसांनी घरात घुसून माझे भाऊ बापूराव आणि पुतण्याला उचलले. त्यांना प्रचंड मारहाण करून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले आणि थेट कारागृहात रवाना केले.”
​कथेत मोठा ट्विस्ट: मुलगी थेट पोलीस ठाण्यात हजर
​पोलिसांनी रचलेली ही संपूर्ण कथा तेव्हा उलथीपालथी झाली, जेव्हा मृत घोषित केलेली शिवानी जिवंतपणे समोर आली. तिने आपल्या प्रियकरासह थेट मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठले आणि म्हणाली, “मी जिवंत आहे! माझ्या कथित हत्येच्या खोट्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी जेलमध्ये टाकले आहे.” बुऱ्हानपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर ती जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हजर झाली, तिला पाहताच पोलिसांचे पार धाबे दणाणले.

​पोलिसांचे मौन; मग ‘तो’ मृतदेह कोणाचा ?

​जिवंत मुलगी समोर आल्यानंतर आता बुलढाणा पोलिसांची प्रचंड नाचक्की झाली आहे. मात्र, यासोबतच एक अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे:राजुरा धरण परिसरात सापडलेला ‘तो’ अर्धवट जळालेला आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह नेमका कोणत्या दुर्दैवी महिलेचा होता ?

​तिची हत्या कोणी आणि का केली?
​या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप कुटुंबाला नाहक तुरुंगवास भोगावा लागला असून, मूळ खुनाचा तपास आता पूर्णपणे भरकटला आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणावर आणि स्वतःच्या अजब कारभारावर बुलढाणा पोलिसांनी सध्या तरी ‘मौन’ बाळगणेच पसंत केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129