♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लालपरीची दमदार झेप ! बुलढाणा एसटी विभाग राज्यात अव्वल; उत्पन्नात ४६ कोटींची विक्रमी वाढ

MH 28 News Live / बुलढाणा : महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीने बुलढाणा विभागासाठी अभिमानास्पद कामगिरीची नोंद केली आहे. उत्पन्नवाढीच्या बाबतीत बुलढाणा एसटी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत राज्यभरात मानाचा तुरा रोवला आहे. योग्य नियोजन, चालक-वाहकांची कर्तव्यदक्ष सेवा आणि प्रवाशाभिमुख उपक्रमांच्या जोरावर विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ५७ लाख किलोमीटर बसफेऱ्यांची वाढ केली असून, उत्पन्नात तब्बल ४६ कोटी रुपयांची भर घातली आहे.

या दमदार कामगिरीमुळे बुलढाणा विभागाचा नफाही दुपटीहून अधिक वाढला आहे. मागील वर्षी १० कोटी रुपये असलेला नफा यंदा थेट २२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. प्रवाशांना वेळेवर, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे विभागाकडे ११ लाख नव्या प्रवाशांनी विश्वासाने पाठ फिरवली नसून एसटीची साथ स्वीकारली आहे. यामुळे महसूल वाढीसह प्रवासीसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

या उल्लेखनीय यशाची दखल घेत १ जून रोजी एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात बुलढाणा विभागाच्या विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांचा प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विभाग नियंत्रकांच्या प्रभावी नियोजन व मार्गदर्शनामुळे प्रवासी-किलोमीटरमध्ये मोठी वाढ साध्य झाली असून, कमी खर्चात अधिक कार्यक्षम सेवा देण्याचा उद्देश यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभाग नियंत्रक कार्यालयाचे वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक आणि वाहकांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे प्रत्येक बसमागे सरासरी दहा किलोमीटरची वाढ साध्य झाली. त्यातून ५७ लाख किलोमीटरची अतिरिक्त धावसंख्या पूर्ण झाली आणि तब्बल ११ लाख नवीन प्रवासी एसटी सेवेशी जोडले गेले. बुलढाणा विभागाची ही कामगिरी राज्यातील इतर विभागांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘लालपरी’वरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129