
मुंढे पॅटर्नचा फटका; शेगावच्या नामांकित कचोरी सेंटरची एफडीएकडून तपासणी
MH 28 News Live / शेगाव : राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या धडक मोहिमेची झळ आता शेगावच्या प्रसिद्ध कचोरीलाही बसली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू झालेल्या आक्रमक कारवाईअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एका नामांकित कचोरी सेंटरवर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे व्यापारी व खाद्य व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अचानक धाड; कचोरी साहित्याची तपासणी
अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित कचोरी सेंटरवर धाड टाकली. कचोरी तयार करण्यासाठी वापरले जाणारे पीठ, खाद्यतेल, मसाले तसेच इतर कच्च्या मालाचे नमुने अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शेगावची कचोरी ही राज्यासह देशभरातील भाविकांची पहिली पसंती मानली जाते. त्यामुळे या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने विशेष सतर्कता दाखविल्याचे समोर आले आहे.

व्यावसायिकांमध्ये खळबळ
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेमुळे खाद्य व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळणार नसल्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे.

शेगावमध्ये दरवर्षी लाखो भाविक येत असल्याने येथील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे प्रसिद्ध कचोरी सेंटरवरील या धाडीनंतर आता प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो, याकडे शेगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भेसळीचा संशय खरा ठरणार की कचोरी गुणवत्तेच्या कसोटीवर खरी उतरणार, याचा फैसला आता तपासणी अहवालच करणार आहे.



