♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या; विराज प्रोफाईल्सच्या मालकासह नऊ जणांवर आरोप

MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील रहिवासी आणि बोईसर येथील विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप सुखदेव जाधव यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून मृताच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या मालकासह नऊ जणांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून विराज प्रोफाईल्स कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मात्र कंपनीचे मालक, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग आणि काही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे ते प्रचंड तणावाखाली होते, असेही त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

१९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बोलावण्यात आले होते. या बैठकीला सीईओसह एकूण नऊ जण उपस्थित होते. बैठकीदरम्यान त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले तसेच ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या प्रदीप जाधव यांनी आपल्या फ्लॅटवर परत जाऊन आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली.

सुसाईड नोटमध्ये कंपनीतील काही अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली असून तपास सुरू केला आहे.

मृतकाच्या पत्नी वंदना प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वंदना जाधव आणि त्यांचा मुलगा यश जाधव यांनी आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. आता पोस्टमार्टम अहवाल, सुसाईड नोट आणि इतर पुराव्यांच्या आधारे बोईसर पोलीस संबंधितांवर कोणती कारवाई करतात, याकडे बुलढाणा जिल्ह्यासह औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129