
प्लास्टिक कचरा कराल तर खबरदार…! जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांना २५ हजार दंड, कारावासाचीही तरतूद
MH 28 News Live बुलढाणा : जिल्ह्यात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर पावले उचलली असून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
प्रशासनाने एकेरी वापरातील प्लास्टिकवर नियंत्रण ठेवणे, प्लास्टिक कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण, संकलन, पुनर्वापर आणि शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनाची सक्षम यंत्रणा उभारणे, शाळा, बचत गट आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढविणे तसेच आठवडी बाजारांमध्ये कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा फेकल्यास १०० ते ५०० रुपये, प्लास्टिक जाळल्यास ५०० ते २ हजार रुपये, तर अनधिकृतपणे प्लास्टिक कचरा टाकल्यास ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. बंदी असलेल्या एकेरी वापराच्या प्लास्टिक वस्तूंची विक्री किंवा साठा आढळल्यास १ हजार ते ५ हजार रुपयांचा दंड, पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड, तर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
याशिवाय जत्रा, उत्सव, विवाह समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे, नाले आणि जलस्रोतांमध्ये प्लास्टिक कचरा टाकण्यास तसेच उघड्यावर प्लास्टिक जाळण्यास प्रतिबंध करण्यात आला असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश देशमुख यांनी नागरिक, ग्रामपंचायती आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहकार्य करून बुलढाणा जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.



