
डोंगरशेवलीच्या जंगलात हातभट्टीवर पोलिसांचा धाडसी छापा; हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन महिलांवर गुन्हा
MH 28 News Live / चिखली : डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगलामध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर अमडापूर पोलिसांनी धडक कारवाई करत हातभट्टी दारू व सडावा नष्ट केला. गुरुवार (९ जुलै) रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने जंगलात छापा टाकून ही कारवाई केली
.
या कारवाईदरम्यान डोंगरखंडाळा (ता. चिखली) येथील रेखाबाई सुनील पवार व मंगलाबाई गणेश पवार या दोन महिलांविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेखाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ६०० रुपये) व इतर मिळून ३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मंगलाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ७०० रुपये) व इतर मिळून ३,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळी आढळून आलेली हातभट्टी व दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा सडावा जागीच नष्ट करण्यात आला. ही धडक कारवाई ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले तसेच महिला अंमलदार वैशाली आराख यांनी पार पाडली.
दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून, पुढील तपास ASI निवृत्ती चेके करीत आहेत. अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी उघडलेली ही मोहीम भविष्यातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.



