♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बिबट्याच्या वावराने चिंचखेड भयभीत ! दोन बकऱ्या, दोन कुत्र्यांनंतर वासराचाही मृत्यू; शेतात काम करणाऱ्या मजुराला बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा

MH 28 News Live / देऊळगाव राजा : तालुक्यातील पश्चिम चिंचखेड परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत दोन बकऱ्या आणि दोन कुत्रे मृतावस्थेत आढळून आल्यानंतर १४ सप्टेंबरच्या रात्री एका वासराचाही मृत्यू झाल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातच शेतात फवारणीचे काम करणाऱ्या कामगाराला बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात वन्यप्राण्याच्या संभाव्य वावराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

 

पश्चिम चिंचखेड हे संत चोखामेळा जलाशय अर्थात खडकपूर्णा धरणालगत वसलेले गाव आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस, कपाशी तसेच झाडे-झुडपे असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यासाठी आणि वावरण्यास पोषक परिस्थिती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे का, याची वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी, अशी मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वी नानासाहेब भास्करराव देशमुख यांच्या दोन बकऱ्या मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर परिसरात दोन कुत्रेही मृत आढळून आले. या सर्व घटनांमध्ये नेमका कोणत्या प्राण्याचा सहभाग होता, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नसताना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेतात फवारणीचे काम करणाऱ्या एका कामगाराला बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेला आणखी उधाण आले आहे.

पंप सोडून कामगाराची धाव

कामगाराच्या म्हणण्यानुसार, शेतात फवारणी सुरू असताना त्याला बिबट्यासदृश प्राणी दिसला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने फवारणीचा पंप घटनास्थळीच सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर शेतमालकाला या घटनेची माहिती देण्यात आली. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी त्यानंतर परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा जोर धरू लागली आहे.

वासराच्या मृत्यूने चिंता वाढली

त्याच रात्री परिसरातील एका वासराचा मृत्यू झाल्याचे समोर आले. वासरावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्याच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, हे अधिकृत तपासणी आणि पशुवैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मृत जनावरांच्या घटनांचा सखोल तपास करून वस्तुस्थिती ग्रामस्थांसमोर स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वनविभागाकडून गस्त वाढविण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पश्चिम चिंचखेड परिसराची पाहणी करून मृत जनावरांच्या घटनांचा पंचनामा करावा, घटनास्थळी आढळणारे ठसे, जखमा व अन्य पुरावे तपासावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. बिबट्याच्या वावराची खात्री करण्यासाठी आवश्यक असल्यास कॅमेरा ट्रॅप लावण्यात यावा आणि परिसरात नियमित गस्त वाढवावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतात दिवस – रात्र काम करणारे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संभाव्य धोका गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे. वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास संबंधित पशुपालकांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशीही ग्रामस्थांची अपेक्षा आहे. “मृत जनावरांच्या घटनांची वनविभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा. वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पशुपालकांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी.” अशी प्रतिक्रिया चिंचखेड येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129