♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जलजीवनच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा चुराडा इसरुळमधील निकृष्ट टाकीच्या कामावर संतोष भुतेकरांनी चालवला हातोडा ‘शोले स्टाईल’ आंदोलनाचा इशारा

MH 28 News Live / इसरुळ ( मंगरूळ ) :: केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली ग्रामीण भागात जनतेच्या घामाच्या पैशांची कशी उघड्याडोळ्यांनी लूट सुरू आहे, याचा जिवंत पुरावा चिखली तालुक्यातील इसरुळ ( मंगरुळ ) येथे समोर आला आहे. गावाच्या भविष्यातील पाण्याचा पाठीचा कणा असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम अत्यंत निकृष्ट, बोगस आणि तांत्रिक निकष धाब्यावर बसवून करण्यात आले आहे. ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे झालेल्या या कामावर युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी भ्रष्टाचाराचा हातोडा चालवत प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.

 

​अधिकारी झोपले अन् ठेकेदाराचे भले झाले

काम सुरू असतानाच तांत्रिक निकष, इस्टीमेट आणि मंजूर आराखड्यानुसार दर्जेदार काम करा, अशी ओरड ग्रामस्थ व संतोष भुतेकर यांनी वारंवार केली होती. मात्र, मलिदा खाण्यात मशगूल असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता काम पूर्ण झाल्यावर पाहणी केली असता, टाकीच्या आकारात आणि बांधकामाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. “आम्ही आधीच ओरडत होतो, तेव्हा अधिकारी झोपले होते का?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​व्हिडिओ व्हायरल करून बोगसगिरी वेशीवर टांगली

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे उघडे पाडण्यासाठी संतोष भुतेकर यांनी या निकृष्ट कामाचा प्रत्यक्ष पाहणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या बोगस कारभाराची पोलखोल झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काम बोगस झाले असतानाही केवळ कागदी घोडे नाचवून देयके (बीले) काढण्याची घाई प्रशासनाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

​देयके रोखा; नव्याने काम करा नाहीतर वसुली करा !

भ्रष्टाचाराचा दर्प येत असलेल्या या कामाची स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराची उर्वरित सर्व देयके तात्काळ रोखावीत. जर काम तांत्रिक निकषात बसत नसेल, तर हे निकृष्ट काम पाडून नव्याने उभारणार की दुरुस्ती करणार, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे. तसेच जनतेच्या निधीचा अपव्यय करणाऱ्या दोषी अभियंते आणि ठेकेदाराकडूनच या पैशांची वसुली करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा टाकीवरच ‘शोले स्टाईल’ अन्नत्याग

येत्या १५ दिवसांच्या आत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या संपूर्ण बोगस प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर इस्रूड येथील याच बोगस पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा कडक इशारा संतोष पाटील भुतेकर यांनी दिला आहे. जनता आणि त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा लढा अंतिम टप्प्यापर्यंत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129