
ई-स्कूटी चोरीचा मास्टरमाइंड अखेर गजाआड; रिसोड पोलिसांनी केली जळगाव जामोदवरून अटक
MH 28 News Live / जळगाव जामोद : फसवणुकीच्या गुन्ह्यात पटाईत असलेला आणि ठावठिकाणा बदलत अनेकांना गंडा घालणारा परवेज युसूफ देशमुख (वय ४७, रा. राणी पार्क, जळगाव जामोद) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रिसोड पोलिसांनी तांत्रिक तपास व सायबर सेलच्या मदतीने मोठ्या शिताफीने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून तीन ई-स्कूट्या व तब्बल १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विश्वास संपादन करून स्कूट्या लंपास करण्याचे तंत्र परवेज देशमुख वापरत असे. त्याच्यासह याच्यासह सादीक देशमुख व शेख तनविर शेख हारुण या तिघांनी संगनमत करून रिसोड येथील ई-मोटर्स दुकानातील विक्रेत्याचा विश्वास संपादन केला. “रक्कम नंतर देतो” असे सांगत त्यांनी तीन ई-स्कूट्या घेतल्या. मात्र पैसे न देता गायब झाले. याप्रकरणी ई-मोटर्स विक्रेत्याने रिसोड पोलिसांत गुन्हा नोंदवला होता.
मुंबईत लपून, मोबाईल बदलून केली पोलिसांची दिशाभूल
आरोपी नेहमी ठिकाण बदलून राहत असल्याने पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तो वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरून पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र डीबी पथकाने सायबर सेलच्या मदतीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास सुरूच ठेवला.

सिनेस्टाईल सापळा – आरोपी अखेर गजाआड
१२ सप्टेंबर रोजी परवेज देशमुख हा जळगाव जामोद येथे आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचला. थरारक कारवाई करून त्याला जळगाव जामोद येथून अटक करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे ई-स्कूटी चोरीचा मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात आला असून, रिसोड पोलिसांची ही महिन्यातील पाचवी धडाकेबाज कामगिरी ठरली आहे.



