
गर्भाशयाच्या कर्करोगावर आली लस; सीरम इंस्टिट्यूट आज लाँच करणार
MH 28 News Live : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे अनेक महिलांचे योग्य उपचाराअभावी बळी जात आहेत. मात्र, या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं ‘क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ ही स्वदेशी लस विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी उद्याच 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत, अशी माहिती आहे.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील प्रभावी लस तयार करण्यास परवानगी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट आज लस लाँच करणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वदेशी विकसित देशातील पहिली क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन (qHPV) गुरुवारी म्हणजेच, आज लाँच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभागानं 1 सप्टेंबर रोजी गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारासाठी स्वदेशी लस विकसित करण्याची योजना आखली. विशेष म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑथरायझेशन मिळालं होतं. सध्या या आजारावरील प्रभावी लस भारत सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
काय आहे सर्वाइकल कॅन्सर ?
Cervical cancer हा कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो गर्भाशयाच्या ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे, लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. या कर्करोगावरील प्रभावी लस वय वर्ष नऊ ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
लस गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी
भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमाण वाढले आहे. एका अहवालानुसार, 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेनं एक ठोस पाऊल ठरू शकतं.