
अंध निराधार महिलेचा चिखली तहसीलदारांना आत्मदहनाचा इशारा; दोन वर्षांपासून मिळाले नाही अनुदान
MH 28 News Live, उदनगर : गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले निराधाराचे मानधन १५ दिवसात सुरू करावे अन्यथा वैरागड ग्रामपंचायत समोर आत्मदहन करेल असा इशारा चिखली तहसीलदार यांना वैरागड येथील शशीकला जगदेव पानझाडे या अंध निराधार महिलेने ३१ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले की, मी दोन्ही डोळ्यांनी अंध असून मला जवळचे असे कोणीही नातेवाईक नाही तुटपुंज्या पगारावर गुजरान करत होती २ वर्षापासून सदर निराधाराचे मानधन (पगार) बंद झाला व मला माझे जीवन जगणे अतिशय बिकट झाले करिता निराधाराचा पगार सुरू करण्यात यावा ज्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या चुकीमुळे माझा निराधारचा पगार २ वर्षापासून बंद झाला सदरहू कर्मचाऱ्यांकडून माझा खंडित दोन वर्षाचा पगार वसूल करून देण्यात यावे कारण लोकांकडून उसनवार घेतलेले पैसे मी त्यांना परत करू शकेल मला १५ दिवसात योग्य तो न्याय न मिळाल्यास मी वैरागड ग्रामपंचायत समोर माझे आत्मदहन करेल कारण मला जगण्याचा कोणताही पर्याय उरला नाही असे निवेदनात नमूद केले आहे.