
आरटीईतील प्रवेश प्रक्रियेला झाली सुरूवात. १७ मार्चपर्यंत अर्ज करा
MH 28 News Live, बुलडाणा : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यीत शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यात ऑनलाईन पद्धतीने १७ मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे.
सन २०२३ – २४ या वर्षातील २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता अर्ज भरण्याची सुचना २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेकरीता शाळांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता पालकांना ऑनलाईन पद्धतीने १७ मार्चपर्यंत अर्ज भरता येईल. अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असणारी कागदपत्रे, निवासी पुरावा, इतर अनुषंगिक माहिती student.maharashra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील शिक्षण विभागाच्या कार्यालयात चौकशी करावी. तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्याध्यापक आणि संबंधित यंत्रणा कार्यालयांनी जास्तीत जास्त पालक सहभागी होण्यासाठी जागृती करावी. सन २०२३ – २४ या वर्षात बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकारातील २५ टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.