
अकोल्यात प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कार्यक्रमात गर्दीत घुसून दागिने चोरणाऱ्या १० जणी गजाआड, दागिनेही केले जप्त
MH 28 News Live : अकोल्यात सुरू असलेल्या ‘श्री शिव महापुराण कथा’ कार्यक्रमात आलेल्या महिला भक्तांची सोनसाखळी चोरी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केलीये. ही टोळी आंतरराज्यातील असून यामध्ये महिला आरोपींचा पर्दाफाश करून पोलिसांनी १० महिलांना अटक केली.
अकोला- पातूर महामार्गावरील म्हैसपुर इथे ५ मे पासून ‘पंडित प्रदीप मिश्रा’ यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. येत्या ११ मे पर्यंत ही कथा चालणार आहे. या कथेत महिलांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत अनेक महिला चोरट्यांनी या कथेला आपलं लक्ष करीत इथे आलेल्या भाविकांचे मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या. गेल्या दोन दिवसात या कथेत चोरीच्या पंधराहून अधिक घटना घडल्या.
या चोरीच्या गुह्याचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हाती घेतला. अशाच काही चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी अकोला पोलीस भाविकांसोबत फिरले. त्यात काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. तब्बल दहा महिला चोरट्यांना अटक करण्यात आली असून या सर्व महिला बाहेर जिल्ह्यातील तर काही राज्याबाहेरील असल्याचे समजते. पोलिसांनी या महिलांकडून सोन्याचे दागिने देखील हस्तगत केल्याचे वृत्त आहे.