
जिल्हाधिकारी कार्यालयाचा होणार लवकरच स्थानांतरण…? खरं काय…?
MH 28 News Live, चिखली : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे शासकीय यंत्रणेचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालवला जातो, तसेच विविध शासकीय यंत्रणांचे सूत्रसंचालक देखील येथूनच होते. मात्र लवकरच या कार्यालयाचा पत्ता बदलण्याची शक्यता आहे. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी चार दिवसांपूर्वी याबाबत सुतोवाच केले असून खरे काय आणि खोटे काय त्याचा घेतलेला हा पडताळा.
त्याचे असे आहे की, मागील अनेक दिवसांपासून खडकपूर्णा नदी पात्रातील वाळू तस्करीचा मुद्दा गाजत आहे. चिखली तालुक्यातील इसरुळ मंगरूळ या गावचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी ही वाळू तस्करी बंद व्हावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान अनेकदा महसूल विभागाचे कर्मचारी, नायब तहसीलदार, चिखली व देऊळगाव राजा येथील तहसीलदार, सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी आणि थेट जिल्हाधिकारी यांच्याशी यांनी संपर्क करून अर्ज विनंती केल्या. मात्र जिल्हा प्रशासनाला ही वाळू तस्करी रोखण्यात आजपर्यंत तरी यश आले नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपले अपयश मान्य न करता या अपयशाचा राग संतोष भुतेकर यांच्यावर प्रशासनाकडून काढला जात असून त्याचाच अनुभव दि. २१ जून रोजी भुतेकर यांना आला. जिल्हाधिकारी यांच्या कक्षात देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथील नागरिकांसोबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या संतोष भुतेकर यांच्यावर आग पाखड करत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील असे काही बोलले की ज्यामुळे एक नवीनच विषय चर्चेत आला आहे.
असा घडला प्रकार
मंडपगाव येथील रहिवाशांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना भेटण्यासाठी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात गेले असता संतोष भुतेकर हे देखील या गावकऱ्यांसोबत तेथे गेले. जिल्हाधिकारी कक्षात गावकऱ्यांनी निवेदन सादर केल्यानंतर सहाजिकच तेथे उपस्थित असलेले संतोष भुतेकर व जिल्हाधिकारी पाटील यांची नजरानजर झाली. भुतेकर यांना पाहताच अकस्मातपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या पारा चढला व त्यांनी संतोष भुतेकर यांच्याशी मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. ” तू येथे का आला आहेस ? तू माझ्या चांगला लक्षात आहेस, तू अतिशय उर्मट आहेस, तुला मी चांगलीच अद्दल घडवतो ” असे ते बोलू लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा अनपेक्षित वागण्यामुळे तेथे उपस्थित असलेले सर्वजण आवाक झाले. उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अधिकच भडकले व गावकऱ्यांना उद्देशून ” मला तुमचं सगळं काही माहिती आहे, मी आता असं करतो; माझं इथलं ऑफिस हलवतो आणि तुमच्या मंडपगाव येथेच जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करतो. मला जिल्ह्यात दुसरी कुठलीच काम नाहीत, फक्त तुमचीच एक समस्या आहे जी सोडवणे हे माझे काम आहे ” असे तावातावाने बोलू लागले. संतोष भुतेकर यांनी देखील सौम्य शब्दात मात्र बाणेदारपणे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना प्रत्युत्तर दिले. ” आमच्या समस्या आम्ही जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुमच्याकडे मांडायच्या नाहीत तर मग कोणाकडे मांडायच्या ? ” असा सडेतोड प्रश्न भुतेकर यांनी उपस्थित केला. यावर मात्र जिल्हाधिकारी पाटील हे पुरते निरुत्तर झाले.
जिल्हाधिकारी कक्षात चाललेला हा गोंधळ पाहून आत जाण्याच्या प्रतीक्षेत कक्षाबाहेर उभे असलेले शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व अन्य नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात आले व त्यांनी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांचा संताप काही कमी होईना. अखेर निवेदन देण्यासाठी आलेल्या मंडपगावच्या गावकऱ्यांना तेथे जमलेल्या लोकांनी बाहेर जाण्याची विनंती केली व हे सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर आले. बाहेर आल्यानंतर उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या या बेजबाबदारपणाच्या वर्तनाबद्दल व त्यांच्या अशा बोलण्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. घडलेल्या प्रकाराबद्दल संतोष भुतेकर यांनी देखील एक व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला असून त्यामध्ये या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती कथन केली आहे.
सन १८६७ मध्ये इंग्रजी राजवटीत बुलढाणा जिल्ह्याची निर्मिती झाली. तेव्हापासून बुलढाणा येथेच जिल्ह्याचे मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय आहे. आज या गोष्टीला १५७ वर्षे झालीत. मात्र या काळात एकाही जिल्हाधिकाऱ्याने समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी असे वर्तन केल्याचे ऐकिवात नाही. डॉ. किरण पाटील यांच्या आशा वागण्या बोलण्यामुळे, समस्येचा निपटारा करण्याऐवजी नागरिकांना दमदाटी करण्यामुळे जिल्हाधिकारी या पदावर असलेल्या व्यक्तीकडून जिल्ह्याला कशाप्रकारे न्याय दिला जातो याचे हे वेगळे उदाहरण समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थानांतरण होवो अथवा न होवो मात्र, डॉ. किरण पाटील यांचे स्थानांतरण कधी होते असा प्रश्न जिल्ह्यातील संतप्त नागरिक आता विचारू लागल्यास आश्चर्य वाटायला नको.