
MH 28 News Live / चिखली : राजपूत समाजाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्याने आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना अखर यश आले आहे. दि. १२ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली.
या महामंडळाच्या स्थापनेबाबत आ. श्वेताताई महाले, आ. जयकुमार रावल, आ किशोर पाटील व आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात दि २५ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे विधान भवनात राजपूत समाजाच्या शिष्टंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता दिलेली होती. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील आ. श्वेताताई महाले यांनी लक्षवेधी क्र. २०७६ हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत दि. २० डिसैंबर २०२३ रोजी सभागृहात चर्चा झाली. यावेळी इतर मागास वर्ग, सामजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री यांनी ” हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेट समोर ठेवून महामंडळ स्थापन करण्यात येईल ” असे आश्र्वासन सभागृहाला दिलेले होते. परंतु, याबाबत सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आ. श्वेताताई महाले यांनी ही बाब पुन्हा या पावसाळी अधिवेशनात मागील आठवड्यात अर्थ संकल्पवरील चर्चेदरम्यान उपस्थित केली होती.
या आर्थिक विकास महामंडळाची फाईल शोधून तातडीने महामंडळ स्थापन करण्यात यावे या मागणीचा पुनरुच्चार करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या सभागृहात राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्याने सकल राजपूत समाज बांधवांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याने आ श्वेताताई महाले यांच्या भगीरथ प्रयत्न फलद्रूप झाले आहे.