♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड; मनसेची वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

MH 28 News Live / चिखली : शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असून, या प्रकाराकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असताना, संबंधित अधिकारी मात्र कारवाई करण्याऐवजी वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २३ मे रोजी उपवनसंरक्षक बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात हा मुद्दा उपस्थित केला. चिखलीतील जाफ्राबाद रोडवरील खबुतरे ले-आऊटच्या पाठीमागे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर लाकडे कापून साठवली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही लाकडे वाळवून काही काळाने नेली जात असून, त्यानंतर पुन्हा नव्याने वृक्षतोड केली जात आहे.

या प्रकाराची माहिती काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वनपाल खान यांना दिली होती. मात्र त्यांनी घटनास्थळी न पाहणी केली, न पंचनामा केला. याउलट लाकूडतोडींनी तात्काळ लाकडांची जागा बदलून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित वनपाल व इतर अधिकाऱ्यांनीच वृक्षतोड करणाऱ्यांना माहिती दिल्याचा संशय उपस्थित झाला आहे.

मनसेने आपल्या निवेदनात वृक्षतोडीची सखोल चौकशी करून लाकडांचा साठा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात संलग्न असलेल्या व दुर्लक्ष करणाऱ्या वनपाल व वन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, तसेच मधुकर ठेंग आदी उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129