
धुऱ्यावरुन रक्तरंजित संघर्ष; शेतकऱ्यावर चाकू हल्ला… शेंबा येथे झाला खून खराबा !
MH 28 News Live / नांदुरा : तालुक्यातील शेंबा बु. शिवारात शेतजमिनीतील धुर्याच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. गट क्र. ४ मधील दीड एकर बागायती शेतात धुऱ्याच्या नुतनीकरणावरून शेतकरी प्रल्हाद करंकार यांच्यावर शेजारील शिवदास करंकार याने चाकूने प्राणघातक हल्ला केला.
ही घटना २७ मे रोजी दुपारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद करंकार यांनी त्यांच्या शेतात जेसीबी मशीनच्या मदतीने धुर्याची माती खोदून नुतनीकरणाचे काम सुरू केले होते. हे काम पाहून संतप्त झालेल्या शिवदास करंकार याने तक्रार देणाऱ्या प्रल्हाद यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रल्हाद करंकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात शिवदास करंकार याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
स्थानिकांत खळबळ
शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात शेतजमिनीच्या किरकोळ वादातून असा हिंसक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.