♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पर्यावरणपूरक विवाह सोहळा: डोणगावमध्ये वरात बैलगाडीतून, परंपरांना दिली नवसंजीवनी

MH 28 News Live / डोणगाव : येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरण प्रेमी व वृक्षमित्र म्हणून परिचित असलेले स्थानिक व्यापारी गणेश आप्पाजी गोळे यांनी आपल्या कन्येच्या लग्नात पर्यावरणपूरकतेचा आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम घडवून आणला.

या लग्नाची सर्वात खास गोष्ट म्हणजे नवरदेव आणि वऱ्हाड्यांना लग्नमंडपात पारंपरिक वाद्ये आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी आधुनिक वाहनांऐवजी १४ बैलगाड्यांचा वापर करून त्यांनी एक वेगळीच परंपरा जिवंत केली. बैलगाड्यांना रंगीबेरंगी पोशाख, हार, बिल्ले घालून सजवण्यात आले होते. वऱ्हाड्यांनी पितांबर, फेटे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.

लग्नाचा मांडवही तितकाच आकर्षक आणि पर्यावरणस्नेही होता. शामियान्याऐवजी हिरव्या पळसाच्या पानांपासून मांडव तयार करण्यात आला होता. जेवणासाठी प्लास्टिक किंवा कागदाऐवजी पळसाच्या पानांची द्रोण-पत्रावळी वापरण्यात आली. वधू शुभांगीने देखील पारंपरिक मळवट भरून आणि टिकल्या, पारंपरिक दागिन्यांनी शृंगार करून जुनी मराठमोळी परंपरा जपली.

या विवाह सोहळ्याची चर्चा केवळ गावातच नव्हे, तर सोशल मीडियावरही जोरात झाली. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत हरवलेल्या परंपरांना दिलेल्या नवसंजीवनीचे स्वागत केले. हा विवाह सोहळा निसर्गाशी नातं जपणाऱ्या आणि परंपरांचा आदर करणाऱ्या नवदांपत्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129