
दुर्दैवी रेल्वे अपघातात मुंबईतील पोलीस शिपायाचा मृत्यू; मयत देऊळगाव राजा तालुक्यातला, जुमडा गावावर शोककळा
MH 28 News Live / बुलढाणा : मुंबईतील मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या भीषण रेल्वे अपघातात बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जुमडा गावचा रहिवासी विकी मुख्यदल हा गेल्या चार वर्षांपासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या अपघाती निधनाच्या बातमीने गावात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरावर दु:खाचे सावट पसरले आहे.
हा दुर्दैवी अपघात प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा विरुद्ध दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला लागून झाल्याने घडला. यामुळे काही प्रवासी गाडीतून खाली पडले. यामध्ये विकी मुख्यदल याचा देखील मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवाशांनी प्राण गमावले आहेत.
विकीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले होते. त्याच्या मेहनतीने आणि चिकाटीने त्याने कुटुंबाचे स्वप्न साकार केले होते. दुर्दैवाने त्याचे हे यश फार काळ टिकले नाही. कर्तव्यनिष्ठा आणि निष्ठेने पोलीस दलात सेवा करणाऱ्या या युवकाचा मृत्यू कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा आघात ठरला आहे.
त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक लहान मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी विकीच्या शिक्षणासाठी आणि यशासाठी मोठा संघर्ष केला होता. विकीच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या आशा-स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
मुंबईच्या गर्दीने भरलेल्या जीवनात रोज होणारी धावपळ आणि असुरक्षित प्रवास पुन्हा एकदा अशा अपघातांमधून समोर येत आहे. ही घटना प्रशासनासाठी आणि सामान्यांसाठीही विचार करायला लावणारी ठरत आहे.