
वाद होता जुना… ठरला जीवघेणा…! जलंब येथे लोखंडी पाइपने बेदम मारहाण; युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघांना अटक
MH 28 News Live / जलंब : गावातील जुना वाद जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना जलंब येथे समोर आली आहे. चार जणांनी मिळून एका युवकावर लोखंडी पाइपने बेदम हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव योगेश मोहे (रा. जलंब) असे आहे. गावातील वासुदेव धोंडुजी मोहे, गजानन धोंडुजी मोहे, शालिग्राम धोंडुजी मोहे आणि विशाल शालिग्राम मोहे या चार आरोपींनी जुन्या वादातून योगेशवर त्याच्या घरासमोरच लोखंडी पाइपने हल्ला चढवला. या अमानुष मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाला.
प्रथमतः त्याला अकोल्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढे नागपूरला हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना योगेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मोहे कुटुंबियांमध्ये एकच आक्रोश उसळला.
खुनाचा गुन्हा दाखल; तिघांना अटक, एक फरार
घटनेनंतर जलंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून एक आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नन्हेखा तडवी व बोदडे करीत आहेत. संपूर्ण प्रकरणामुळे जलंब परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.