
बिग ब्रेकिंग न्यूज… ११५ वर्षांची प्रतीक्षा संपली! खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण मंजुरी !
MH 28 News Live / चिखली : खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या निर्मितीची तब्बल ११५ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला भारत सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, २६ मे रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्या करिता अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या प्रक्रियेत एक मोठे आणि निर्णायक पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ च्या कलम ३७A अंतर्गत केंद्र सरकारने जालना ते खामगाव दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला “विशेष रेल्वे प्रकल्प” म्हणून अधिसूचित केले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत साकारण्यात येणारा हा प्रकल्प सार्वजनिक प्रयोजनासाठी राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राजपत्रातील अधिसूचनेनुसार या रेल्वे मार्गासाठी जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, या रेल्वे मार्गासाठी बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, तसेच रेल्वे लोकआंदोलन समितीने अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला होता. राज्य सरकारनेही सुमारे दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून अखेर या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने दोन्ही जिल्ह्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामगाव – जालना रेल्वे मार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील आर्थिक, औद्योगिक तसेच शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेषतः मागास समजल्या जाणाऱ्या बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांसाठी हा रेल्वेमार्ग विकासाचा नवा मार्ग ठरणार आहे. व्यापार, शेतीमाल वाहतूक, रोजगारनिर्मिती आणि प्रवासाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
दरम्यान, रेल्वे लोकआंदोलन समितीने या मंजुरीबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे आभार मानले आहेत. लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून या प्रकल्पाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



