
शेळ्यांना वाचवताना महिलेचा दुर्दैवी अंत; महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत १५ शेळ्यांचाही मृत्यू
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील खुमगाव बुरटी रेल्वे स्थानकाजवळ एक हृदयद्रावक दुर्घटना घडली असून शेळ्यांना वाचवण्यासाठी रेल्वे रुळांकडे धाव घेतलेल्या महिलेचा आणि तब्बल १५ शेळ्यांचा महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

लताबाई सांगळकर (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून त्या खुमगाव बुरटी येथील रहिवासी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई या नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गावाजवळील परिसरात गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या काही शेळ्या रेल्वे रुळांच्या दिशेने गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेळ्यांना परत आणण्यासाठी त्या तातडीने रेल्वे रुळांजवळ धावल्या. याचवेळी भरधाव वेगाने धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस त्या मार्गावरून येत होती. रेल्वेगाडीचा वेग आणि तिचे अंतर याचा अंदाज येण्यापूर्वीच लताबाई यांना गाडीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेमुळे रेल्वे रुळांवर असलेल्या १५ शेळ्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू केला आहे.

लताबाई सांगळकर या कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ मानल्या जात होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेमुळे रेल्वे रुळांच्या परिसरात जनावरे चारताना तसेच रेल्वे मार्ग ओलांडताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



