
चिखलीच्या बाबू लॉज चौकात भिडले; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
MH 28 News Live / चिखली : शहरात आज १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या गटारोळ्यामुळे शहराचे वातावरण तणावग्रस्त झाले आहे. दोन प्रभावशाली सामाजिक कार्यकर्त्यांचे नातेवाईक व समर्थक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात शेकडो लोक सहभागी झाले होते. उबेद अली खान उर्फ भाईजान आणि हाजी निसार कुरेशी या दोन गटांमधील जुन्या वैमनस्याचा आज उद्रेक झाला.

संध्याकाळी सुमारे आठ वाजता बाबुलाज चौकात असलेल्या हाजी निसार सेठ यांच्या पानमसाला दुकानावर मोठा जमाव धडकला. यानंतर सुरू झालेल्या मारामारीत दोन्ही बाजूंमध्ये तुफान हाणामारी झाली. या संघर्षात सुमारे १० ते १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक वाद, व्यवसायिक स्पर्धा आणि नातेवाईकांमधील तणाव यामुळे या दोन गटांमध्ये रेंगाळणारे भांडण वेळोवेळी उसळत असते. आजची घटना मात्र सर्वांत मोठी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही रहिवाश्यांच्या मते, या वादाला सामुदायिक रंग चढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुढील तणाव टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या घटनेची तीव्र निंदा केली असून, शहरातील शांतता राखण्यासाठी दोन्ही गटांच्या नेत्यांनी पुढे येऊन मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



