
रेल्वे प्रवास झाला आता जोखीमीचा ! झोपणे, गप्पा करणे याबाबत आले नवे नियम
MH 28 News Live : रेल्वेमधून प्रवास करताना आता पहिल्यासारखे कसेही झोपून चालणार नाही. कारण रेल्वे प्रवासात झोपण्यासंबंधीचे नवे नियम रेल्वे प्रशासनाने तयार केले असून या नियमांचे उल्लंघन करणार्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई देखील करण्याची तरतूद या नव्या नियमात असेल.
यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र आता प्रवाशांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांना प्रवासादरम्यान शांत झोप घेता यावी यासाठी रेल्वेने नियम केला आहे. या नवीन नियमाबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही देखील अडचणीत येऊ शकता.
▪️ रेल्वे प्रवासादरम्यान झोपेसाठी नवीन नियम
या नव्या नियमानुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाही. प्रत्यक्षात प्रवाशांनी केलेल्या अशा अनेक तक्रारींनंतर रेल्वेने हा नियम केला आहे. यामुळे कोणत्याही प्रवाशाच्या झोपेचा त्रास होणार नाही. एवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाईची तरतूद आहे. म्हणजेच आता तुम्ही ट्रेनमध्ये शांतपणे झोपू शकता.
हे नियम तातडीने लागू करावेत, असा आदेश रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व झोनला जारी केला आहे. या नवीन नियमांनुसार, कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडवण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची असेल.
▪️ मोबाईलवर गाणी ऐकण्याबरोबरच लोक ग्रुपमध्ये बसून मोठमोठ्याने बोलतात आणि हसतात, विनोद करतात अशा अनेक तक्रारीही रेल्वेकडे आल्या होत्या. याशिवाय दिवाब लावणे आणि विझविण्याबाबतही अनेक वाद झाले आहेत. यामुळे रेल्वे मंत्रालयाने हे नवे नियम केले आहेत.



