♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मार्च एण्डलाच सूर्यनारायण कोपले; बुलडाण्यासह या जिल्ह्यांमध्ये येणार उष्णतेची लाट

MH 28 News Live : : मार्च महिन्याचा सुरुवातीचा काळ उन्हाच्या झळांनी हैराण करणारा ठरला असतानाच आता महिन्याची अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस दाहक ठरण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ कायम राहणार आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट ?

राज्यात सर्वच ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत नगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र असेल. २९ ते ३१ मार्च या कालावधीत अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत, ३१ मार्चला चंद्रपूर, तर ३०, ३१ मार्चला वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल.

विदर्भात सध्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. या विभागात सर्वच ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. सरासरीच्या तुलनेत या भागात २ ते ४ अंशांनी तापमान वाढले असल्याने उन्हाचा चटका तीव्र आहे. दोन-तीन दिवसांत त्यात आणखी वाढीची शक्यता आहे. अकोला येथे सोमवारी राज्यातील उच्चांकी ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात ३१ मार्चपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे.

मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर वगळता इतरत्र कमाल तापमान ४० अंशांजवळ आले आहे. या विभागात ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे. मराठवाडय़ात सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. या विभागातही ३० मार्च ते १ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. मुंबई परिसर आणि कोकणातील तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आहे. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत त्यात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129