
पर्यटनासाठी एस.टी. ची खास पॅकेज यात्रा सेवा; देवदर्शन आणि पर्यटन स्थळांना भेटीची संधी
MH 28 News Live / बुलढाणा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बुलढाणा विभागातर्फे सर्व आगारांमधून पर्यटकांसाठी खास पॅकेज यात्रा सेवा सुरू करण्यात आली आहे. यामार्फत एक दिवस ते तीन दिवसांपर्यंत देवदर्शन व पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.
ग्रुप बुकींगसह नियोजित ठिकाणी एस.टी.ने प्रवास
या विशेष सेवेंतर्गत ग्रुप बुकींगच्या माध्यमातून विविध आगारांमधून प्रवाशांसाठी नियोजित स्थळांकरिता वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक दिवसाच्या पॅकेजमध्ये अजिंठा लेणी, वेरुळ, घृष्णेश्वर, खुलताबाद व पैठण अशा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

ओंकारेश्वर-उज्जैनसाठीही सेवा
प्रवाशांच्या विशेष मागणीनुसार एस.टी. महामंडळाने मध्यप्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर व उज्जैन या ठिकाणांसाठीही वाहतूक सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या पॅकेज यात्रेबाबत अधिक माहिती, शुल्क, प्रवासाचे वेळापत्रक तसेच बुकींग प्रक्रिया यासाठी आपल्या जवळच्या एस.टी. आगारास भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



