
संतोष परिहार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील अंचरवाडी येथील रहिवासी व अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष दत्तात्रय परिहार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिखली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी दि. २४ ऑगस्ट रोजी काढलेल्या नियुक्ती पत्रकाद्वारे संतोष परिहार यांची या पदावर नेमणूक केली.

संतोष परिहार हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित असून तालुक्याच्या ग्रामीण भागात पक्षाचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करून एक महत्त्वाची संधी परिहार यांना बहाल केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे व जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांना आपल्या नियुक्तीचे श्रेय संतोष परिहार यांनी दिले आहे.
” माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन जो विश्वास माझ्या प्रति व्यक्त केला त्याची परतफेड मी पक्षाचा पाया चिखली तालुक्यात अधिक मजबूत करून उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार व कार्य सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन ” अशा शब्दात संतोष परिहार यांनी आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. परिहार यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



