
भाच्याचा भन्नाट फंडा; लाडकी बहीण’ योजनेतून मावशीलाच घातला गंडा…!
MH 28 News Live / मेहकर : मेहकर तालुका आणि वाशीम जिल्हा दोन ठिकाणी घडलेल्या भन्नाट कारनाम्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा विषय गावागावात गाजू लागला आहे. महिलांसाठी खास राबविलेल्या या योजनेत पुरुषांनीच घुसखोरी करून लाभ ओढल्याचे उघड होत आहे.
आधारचा खेळ आणि भाच्याची लबाडी
सामान्यत: भाऊ बहिणीसाठी जीव तोडून झटतो, पण या भाच्याने तर उलटच खेळ केला. ‘त्या’ महिलेने आपला अर्ज भरण्याची जबाबदारी भाच्याकडे सोपवली. भाच्याने मावशीचा फोटो जोडला खरी, पण आधारकार्ड मात्र स्वतःचे टाकले. काय सांगता! अर्ज भरून देतानाच त्याने स्वतःला ‘लाडकी बहीण’ बनवले आणि दरमहा दीड हजार रुपये थेट आपल्या खात्यात जमा करून घेतले.

पडताळणीने उघडला गोंधळ
काही दिवसांनी जेव्हा मावशीला लाभाची रक्कम मिळेनाशी झाली, तेव्हा तिनेच प्रशासनाकडे धाव घेतली. पडताळणीत भाच्याचा डाव उघड झाला आणि खेडोपाडी हास्यकल्लोळ उडाला. भाच्याने एकूण १६ हजार ५०० रुपयांचा गंडा घालून मावशीसोबतच शासनालाही फसवले, हे ऐकून ग्रामपंचायतीपासून ते चहाच्या टपरीपर्यंत चर्चेला उधाण आले आहे.
आता बुलढाणा जिल्हा परिषदेकडून १९९ महिलांच्या नावांची पडताळणी सुरू झाली आहे. महिलांसाठीच्या संवेदनशील योजनेत पुरुषांचा शिरकाव हा गंभीर प्रकार असल्याने प्रशासन कडक भूमिकेत आले आहे. पुढील काळात अशा “बोगस लाभार्थ्यांना” धडा शिकवण्याची शक्यता नाकारता येत नाही.



