
मासेमारीच्या जाळ्यात अडकून झाला ‘ त्या ‘ शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
MH 28 News Live देऊळगाव मही : खडकपूर्णा धरण परिसर शनिवारी एका शोकांतिकेला साक्षी ठरला. सुलतानपूर येथील ६९ वर्षीय वृद्ध शेतकरी सुधाकर दामोदर डोंगरे यांचा मासेमारीसाठी अंथरलेल्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी आपल्या शेतातील पाहणीसाठी गेलेले डोंगरे धरण परिसरातून जात असताना मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत त्यांनी सुटण्याचा प्रयत्न केला; मात्र जाळ्याच्या गुंत्यातून बाहेर पडू शकले नाहीत. क्षणोक्षणी संघर्ष करत असताना अखेरीस ते पाण्यात बुडून कायमचे निघून गेले.

शेतजमीन सांभाळत मेहनती जीवन जगलेले डोंगरे यांचे असे अनपेक्षित जाणे ग्रामस्थांना स्तब्ध करून गेले आहे. धरण परिसरात घडलेली ही घटना केवळ एका शेतकऱ्याचा जीव घेऊन गेली नाही, तर ग्रामीण समाजमनाला खोलवर चटका लावून गेली आहे.



