♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मेहकरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल १.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

MH 28 News Live / मेहकर : जिल्ह्यात अवैध गुटखा माफियांना चाप लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाया सुरू आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १.४३ कोटी रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मेहकर तालुक्यात सापळा रचला होता. दोन ट्रकद्वारे मुंबईकडे मोठ्या प्रमाणात गुटखा पाठवला जात असल्याचे पोलिसांना कळले होते. त्यानुसार पथकाने छापा मारत दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. तपासणीअंती या ट्रकमध्ये तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. तसेच दोन्ही ट्रकांची किंमत मिळून ३० लाख रुपये इतकी आहे. अशा प्रकारे एकूण १ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईत ट्रक चालकांसह तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जप्त केलेला गुटखा महाराष्ट्रात विक्रीस बंदी घालण्यात आलेल्या नामांकित ब्रँडचा होता. आरोपींनी ही मालवाहतूक गुप्तपणे मुंबईमार्गे पुढे पाठवण्याचा प्रयत्न केला होता.

मेहकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुटखा कुठून आणला गेला, कोणत्या ठिकाणी पोहोचविण्यात येणार होता, याबाबतची माहिती शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार या जाळ्यात आणखी काही आरोपी सामील असल्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यात गुटख्याच्या अवैध वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मेहकर पोलिसांनी ७७ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला होता. सलग झालेल्या या कारवायांमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून स्थानिक प्रशासनानेही कारवाईचा धडाका कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129