♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अनु.जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण अंमलबजावणी करा मातंग समाज बांधवांचा जन आक्रोश मोर्चा

MH 28 News Live / देऊळगाव राजा : भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याची अंमलबजावणी तात्काळ करा, या मागणीसाठी सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील शेकडो मातंग समाज बांधवांनी आज (ता.२०) बाजार समिती पासून बस स्थानक चौकापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी व्यासपिठावर राज्यभरातून आलेल्या मान्यवरांनी आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मातंग समाजावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करा या मागणीसाठी सिंदखेडराजा मतदार संघातील मातंग समाज बांधवांनी देऊळगाव राजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पासून जन आक्रोश मोर्चा काढला. लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे सचित्र पिवळे झेंडे हातात घेऊन आरक्षण आमच्या हक्काचं, उपवर्गीकरण लागू झालेच पाहिजे अशा घोषणा देत बसस्थानक चौकात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी व्यासपीठावर लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे,भारतीय वंचित जन संसद अध्यक्ष डाॅ.अंबादास सगट, अण्णाभाऊ साठे क्रांतिसेना अध्यक्ष सचिन साठे, क्रांतिगुरु लहूजी साळवे विकास परिषद संस्थापक उत्तमराव कांबळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फोरम संस्थापक विजय अंभोरे, भाजपा प्रदेश अ.जा.मो.महामंत्री सर्जेराव जाधव, क्रांतीसेना अध्यक्ष राजेश घोडे, डीपीआय प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, लहूशस्त्र सेनाप्रमुख संजूबाबा गायकवाड, मातंग समाज प्रबोधन परिषद अध्यक्ष संजय इंचे, क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद प्रदेश अध्यक्ष प्रमोद कांबळे, वाल्मीक समाजाचे नेते मोतीलाल सुंनगत, ॲड. विजय सूनगत उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सुचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण अनेक राज्यांनी लागू केले मात्र महाराष्ट्र शासन मातंग समाजावर अन्याय करीत असल्यास आरोप केला. याचबरोबर अनुसूचित जाती मधील मोठ्या भावानेही समाजावर अन्याय केल्याचा रोष व्यक्त करण्यात आला तर अनुसूचित जातीमधील सर्व समाजाने आपल्यातील एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन ही काही वक्त्यांनी केले. दरम्यान अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

निवेदनावर विठ्ठल शेषराव पाटोळे, सुनील शिवाजी लोखंडे, मंगल रामभाऊ अंभोरे, बलवंत अनिल सुनगत संतोष आसाराम जाधव, मनोहर खंदारे यांच्यासह असंख्य स्वाक्षरी होत्या. सदर जन आक्रोश मोर्चात तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129