
विनापरवाना शेकडो झाडांची कत्तल; महावितरणच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
MH 28 News Live / देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहाँगीर फाटा ते खल्याळ गव्हाण रस्त्यालगत महावितरणच्या विद्युत खांब व तारांच्या कामासाठी तब्बल शेकडो झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाची आवश्यक परवानगी न घेता ही वृक्षतोड झाल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य कंत्राटदारासह संबंधित उपकंत्राटदारांवर वन कायद्यानुसार कठोर कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिनगाव जहाँगीर फाटा ते खल्याळ गव्हाण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुन्या व पर्यावरणपूरक झाडांची सुरुवातीला केवळ विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी केली जात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अनेक झाडे मुळासकट तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कारवाईसाठी वन विभागाची अधिकृत परवानगी, पंचनामा किंवा शासनमान्य प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २०० झाडांची कत्तल करण्यात आली असून त्यातील लाकूड व्यापाऱ्यांना विकून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असताना आणि लाकडांची वाहतूक सुरू असताना वन विभाग व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, वृक्षतोड प्रकरणाशी संबंधित एक वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, वृक्षतोडीविरोधात कठोर कायदे अस्तित्वात असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिकरीत्या विनापरवाना झाडांची कत्तल कशी झाली, यामागे महावितरण व वन विभागातील काही अधिकारी सहभागी आहेत का, याची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाधान मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे आणि युवासेना नेते योगेश मिसाळ यांनी वन विभागाकडे केली आहे. दोषींवर वन कायद्यान्वये कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे.
मंत्र्यांशी थेट संपर्क
या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, युवासेना नेते योगेश मिसाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणात शासन आणि संबंधित विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



