
BDCC निवडणूक… रंगले राजकीय समीकरण फुंडकर–महाले–सावळे आमनेसामने शिंगणे एका मतदारसंघातून माघारी
MH 28 News Live : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान शुक्रवारी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कृषी उत्पादन प्रक्रिया व पणन मतदारसंघातील उमेदवारी मागे घेतल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. सिंदखेडराजा कृषी व पतपुरवठा मतदारसंघातून त्यांची यापूर्वीच अविरोध निवड निश्चित झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मेहकर कृषी पतपुरवठा मतदारसंघातून अविरोध निवड निश्चित झाल्याने त्यांच्या पणन मतदारसंघातील उमेदवारीही मागे घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२५ मतदारांचा मतदारसंघ ठरला प्रतिष्ठेचा
कृषी उत्पादन प्रक्रिया व पणन हा जिल्ह्यातील सर्वात लहान मतदारसंघ असून येथे अवघे २५ मतदार आहेत. त्यापैकी १४ घाटावरील तर ११ घाटाखालील मतदार असल्याने प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. याच मतदारसंघातून कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार धृपतराव सावळे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा मतदारसंघ निवडणुकीतील सर्वाधिक प्रतिष्ठेचा ठरला होता. विशेष म्हणजे २०१० मध्ये याच मतदारसंघातून धृपतराव सावळे यांची अविरोध निवड झाली होती.
माघारीच्या चर्चांनी वाढवली उत्सुकता
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माघारीनंतर आता या मतदारसंघात ॲड. आकाश फुंडकर, धृपतराव सावळे आणि आमदार श्वेताताई महाले यांच्यापैकी कोण माघार घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आकाश फुंडकर आणि धृपतराव सावळे यांचा हा एकमेव मतदारसंघ असून सावळे कुटुंबातील पद्माताई सावळे यांनी महिला मतदारसंघातून, तर राजू सावळे यांनी ओबीसी व कृषी पतपुरवठा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सावळे कुटुंबाचीही महत्त्वपूर्ण उपस्थिती दिसून येत आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एका मतदारसंघातून माघार घेत अविरोध निवड झालेल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याने सहकार क्षेत्रातील या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. आता प्रत्यक्ष लढतीत कोण मैदानात राहणार आणि कोण माघार घेणार, यावरच पुढील निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार असून बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष या प्रतिष्ठेच्या राजकीय लढतीकडे लागले आहे.



