
आता गावठखणापासून 200 मिटरच्या आत व्यवसाय करण्यासाठी एन. ए. ची अट झाली रद्द, राज्य सरकारचा निर्णय
MH 28 News Live : शेतीच्या तुकडे बंदीतील अडचण ओळखून राज्य सरकारने गावठाणापासून 200 मीटर परिसरातील जमिनीला आता ‘एनए’ची गरज राहणार नसल्याचा आदेश 13 एप्रिल रोजी जारी केला आहे. त्यामुळे आता गावठाणापासून 200 मीटरपर्यंत शेतजमिनीचा ‘एनए’ न करता, त्या जागेवर उद्योग-व्यवसाय करता येणार आहे..
अशी होणार अंमलबजावणी..
गावालगतच्या जमिनीच्या ‘एनए’बाबत महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्येक 15 दिवसांनी स्वत: तपासणी करून आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसा अहवाल नियमित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. ‘एनए’बाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेत असले, तरी यासंबंधी सनद देण्याचे अधिकार तहसीलदारांना दिल्याचेही आदेशात नमूद केले आहे.
गावाला लागूनच ढाबा, हॉटेल किंवा पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी महसूल विभागाकडून संबंधित जागेचे बिगर शेती (एनए) करावी लागत होती. शिवाय व्यवसायासाठी 10 ते 12 विभागांच्या ‘एनओसी’ (ना हरकत प्रमाणपत्र) आणावे लागत. त्यासाठी महसूल कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत नि त्यावरच मोठा खर्च होत असे. या सगळ्या प्रक्रिया केल्यावरही दंडाधिकाऱ्यांकडून जागेच्या ‘एनए’ला परवानगी मिळेलच, याचीही काही गॅरंटी नव्हती. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करुन व्यवसाय सुरु करणं सामान्य माणसाच्या आवाक्यातील गोष्टच नव्हती..
गावालगत उद्योग-व्यवसाय सुरु करताना, ती जागा ‘एनए’ करण्यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. अनेक विभागांच्या परवानग्यांसाठी अर्ज- विनंत्या केल्या जातात, पण ही प्रक्रिया किचकट असल्याने, आजही अनेक अर्जदार प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे मालकाला आपल्याच शेतात व्यवसाय सुरु करता येत नव्हता. या नव्या निर्णयामुळे आता ही महत्त्वाची अडचण दूर होणार आहे.



